लोकदर्शन न्यूज राजुरा 👉मोहन भारती
गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र” चा उद्घाटन सोहळा दिनांक ३१ मे २०२५ रोजी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे संपन्न झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात समाजहित व राष्ट्रहिताचा आदर्श ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ अँड. रवींद्रजी भागवत, अधिसभा सदस्य डॉ. संजय गोरे, डॉ. अनिल चिताडे, यश बांगडे, संजय रामगिरवार, गुरुदास कामडी, आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांची उपस्थिती होती. वीर रस कवयित्री शौर्या मौर्य प्रमुख वक्ता म्हणून सहभागी झाल्या.
कार्यक्रमात बोलताना कुलगुरु डॉ. बोकारे म्हणाले की, “कल्याणकारी राज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर योग्य आदर्श जर कोणी घालून दिला असेल तर त्या अहिल्यादेवींनीच. त्या एक उत्तम प्रशासक होत्या. स्वतःच्या फायद्याचा विचार न करता, प्रजाहिताचा विचार करणाऱ्या शासकांचा आदर्श त्या होत्या.”
अँड. रवींद्र भागवत यांनी आपल्या भाषणात अहिल्यादेवींच्या कार्याला मानवंदना दिली. “महिलांच्या अधिकारासाठी त्यांनी लढा दिला, शिक्षण व धर्मकार्याला चालना दिली. देशभर मंदिरे उभारून त्यांनी सांस्कृतिक वारसा जपला,” असे ते म्हणाले.
शौर्या मौर्य यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राणी नव्हत्या तर भारतीय मूल्यांचा उर्जास्रोत होत्या. त्यांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत व्हायला हवा.”
या अध्यासन केंद्राच्या स्थापनेचे श्रेय गुरुदास कामडी यांना जाते. त्यांनी या अध्यासनाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती देताना सांगितले की, “अहिल्यादेवींच्या कार्यावर आधारित संशोधन, ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन, व्याख्याने, लघुसंशोधन आणि जनजागृतीपर उपक्रम केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येतील.”
कार्यक्रमाचे प्रवीण गिलबिले यांनी सुत्रसंचालन केले.
🌟 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र हे भविष्यात समाजाभिमुख संशोधनासाठी एक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.