लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडले.
हे नविनतम सुविधा असलेले स्टेशन चंद्रपूरच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार असल्याचा विश्वास यावेळी धानोरकर यांनी व्यक्त केला. “रेल्वे केवळ प्रवासाचे साधन नाही, तर सामाजिक आणि आर्थिक विकासाचा बळकट दुवा आहे. नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी हे स्टेशन एक महत्त्वाचे पाऊल ठरेल,” असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय विधी मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
तसेच आमदार किशोर जोरगेवार, रेल्वेचे अधिकारी, तसेच काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी – रामू तिवारी, सोहेल शेख, चंदाताई वैरागडे, राहुल चौधरी, गोपाल अमृतकर, प्रशांत भारती, प्रसन्न शिरवार – यांचीही उपस्थिती लाभली.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १९.३ कोटी रुपये खर्चून स्टेशनचे पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये नवीन इमारत, वाढीव प्लॅटफॉर्म्स, फूट ओव्हर ब्रिज, रॅम्प, टॅक्टाइल पाथ यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे.
यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ व सुसज्ज प्रवासाचा अनुभव मिळणार असून, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला.