लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण, दि. २२ –
कामगार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे कामगार नेते रवि शांताराम घरत यांची शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) उरण तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी अलिबागजवळील पेझारी येथे झालेल्या शेकापच्या भव्य मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली.
रवि घरत हे माजी आमदार विवेकानंद पाटील व बाळाराम पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे लढा दिला, विशेषतः DPD प्रकल्पासारख्या प्रश्नांवर संतुलित भूमिका घेत, त्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर शेकापने विश्वास दाखवला आहे.
या निवडीने उरणसह जासई गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. जासई हे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे जन्मगाव असून, अनेक वर्षांनी या गावातून शेकापचा तालुका चिटणीस निवडला गेला आहे.
मेळाव्यात शेकापचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांनी पक्षाला नवे बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला. तरुणाईवर पक्षाची धुरा देण्याचा निर्णय घेत, अनेक तालुक्यांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
आपल्या भाषणात रवि घरत यांनी सांगितले की, “कायद्याच्या चौकटीत राहून कामगारांना न्याय मिळवून देताना जो संघर्ष केला, त्याच जिद्दीने आता शेकापच्या विचारधारेचा प्रचार करून पक्षाला पुन्हा एकदा उभारी देणार आहे.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापला मजबूत यश मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. शेकापचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये या नव्या नेमणुकीमुळे उत्साहाचे वातावरण आहे.