लोकदर्शन👉मोहन भारती
*चंद्रपूर, दि. १६ मे – भारताच्या सार्वभौमत्वासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय सैन्याने केलेली अभिमानास्पद शौर्यगाथा भारतासाठी देदीप्यमान ठरली. या अद्वितीय शौर्याला अभिवादन करण्यासाठी बल्लारपूर येथे रविवार, दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.*
बल्लारपूर येथे आयोजित तिरंगा यात्रेचा शुभारंभ काटा गेट, बल्लारपूर येथून होईल. तर नवीन बस स्थानक, बल्लारपूर येथे यात्रेचा समारोप होईल. या यात्रेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्था, विविध सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्ष, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
‘देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांना साश्रु नमन करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. चला, एकत्र येऊन, भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होऊया आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करत देशभक्तीचा जागर करूया,’ असे भावनीक आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.