जिवती, दि. १९
तब्बल तेवीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिवती तालुक्याकरीता कृषी उत्पन्न बाजार समितीला मंजुरी मिळाली आहे. यासाठी राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले असून या ऐतिहासिक निर्णयाबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
सन २००२ मध्ये राजुरा व कोरपना तालुक्याचे विभाजन करून जिवती या नव्या तालुक्याची निर्मीती करण्यात आली. परंतू निर्मीतीला तेवीस वर्षे लोटूनही तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या विक्रीसाठी पायपीट करावी लागत होती, त्यामुळे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय सहन करावा लागत होता. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात येताच राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ११ मार्च २०२५ रोजी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करतांना राजुरा विधानसभेतील दुर्गम व आकांक्षित असणाऱ्या जिवती तालुक्याकरता शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती मंजूर करावी अशी मागणी केली.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ अंतर्गत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील बाजार समित्या अस्तित्वात नसलेल्या ६५ तालुक्यांसाठी बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये जिवतीचा ही समावेश आहे. जिवती बाजार समितीच्या मंजुरीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल योग्य भावात विकण्याची सोय उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना आपला माल कोरपना बाजार समितीत तसेच अन्य बाजारपेठेत न्यावा लागत होता, त्यामुळे त्यांना वेळेचा आणि पैशाचा अपव्यय सहन करावा लागत होता. नवीन बाजार समितीमुळे वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळण्यासही मदत होईल.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसह, विविध कृषी संघटना व नागरीकांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.
*जिवती तालुक्यातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. – आमदार देवराव भोंगळे.*
जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती अत्यंत महत्त्वाची होती. मागील तेवीस वर्षांपासून याठिकाणी बाजार समितीच नसल्याने शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन करावी लागत होती. मी आमदार झाल्यानंतर जिवती तालुक्यातील वनजमीनीचा प्रश्न, ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही, नविन न्यायालयाची निर्मिती व कृषी उत्पन्न बाजार समितीला मंजुरी अशा बहुप्रलंबीत प्रश्नांना हात घातला आणि शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला. आज अखेर आमच्या प्रयत्नांना यश आले असून जिवती येथील बाजार समितीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल. तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये या बातमीमुळे आनंद पसरला असून तब्बल तेवीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरच्या या निर्णयामुळे निश्चितच जिवती तालुक्यातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अशी प्रतिक्रिया आमदार देवराव भोंगळे यांनी या निर्णयावर बोलतांना दिली.