लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपना : मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती कोरपना यांच्या वतीने AI तंत्रज्ञानावर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यशाळा बुधवार दि. १६ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. या कार्यशाळेला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी उपस्थित राहून चाट जीपीटी व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशासन, ग्रामविकास योजना तसेच शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा कसा प्रभावी वापर करता येतो याचे प्रात्यक्षिकासह सविस्तर विवेचन केले.
प्रशिक्षणास गटविकास अधिकारी मा. विजय पेंदाम, गटशिक्षणाधिकारी मा. सचिन मालवी, पंचायत विस्तार अधिकारी मा. पंढरी गेडाम यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची दिशा स्पष्ट करण्यात आली. कर्मचारी अधिकारी यांना वेळेची बचत करण्याकरिता व झिरो पेंडेंसीकरिता एआय कसा उपयुक्त आहे याबाबत सखोल माहिती देण्यात आली. ही कार्यशाळा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी विजय पेंदाम यांनी व्यक्त केले.