दिव्यांग लाभार्थ्यांना हक्कापासून वंचित ठेवू नका : छोटूभाई शेख : वरोरा न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन

By : Rajendra Mardane
वरोरा : दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवू नका. त्यांना तात्काळ अर्थसहाय्य प्रदान करावे, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते छोटुभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वरोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी ( प्रभारी) यांना दिले. यावर तात्काळ अंमलबजावणी करुन दिव्यांगाना यथाशीघ्र अर्थसहाय्य प्रदान करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी संबंधितांना दिले. छोटूभाई शेख यांनी दिव्यांगाची प्रलंबित मागणी उचलून धरल्याने जवळपास २८७ दिव्यांग लाभार्थ्यांना १४ लाख ३५ हजार रुपये अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ मधील कलम ३७ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांचा ५% निधी दिव्यांग कल्याणासाठी राखून ठेवून त्याचा वापर करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तद्नंतरही जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दिव्यांगासाठी संबंधित निधी वापरलेला दिसत नाही. वरोरा नगर परिषदे तर्फे मार्चच्या पहिल्या आठवड्यात जवळपास ३०० दिव्यांगाना १५ लाख रुपये पर्यंत अर्थसहाय्य प्रदान केले जात होते. यावर्षी मार्च महिन्याची १० तारीख उलटल्यानंतरही हा निधी वितरित न झाल्याने दिव्यांग जणांनी सामाजिक कार्यकर्ते छोटुभाई शेख यांच्याशी संपर्क साधला. याची गांभीर्याने दखल घेत दिव्यांग जणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रथमतः तीन दिवस आधी लेखी निवेदन सादर केले. त्यानंतर पुढाकार घेऊन दिव्यांग महिला – पुरुष यांच्या सह नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांची भेट घेतली, भेटीत अर्थसहाय्य या प्रश्नावर सविस्तर चर्चा करीत दिव्यांगाची कैफियत त्यांचे समक्ष मांडली. याबाबत मुख्याधिकारी यांनी संबंधित विभागाचे प्रमुख घनश्याम तिवारी यांना याबाबतच्या सूचना दिल्या व एक दोन दिवसात लाभार्थ्यांचे खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे उपस्थित दिव्याग लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन त्यांनी मुख्याधिकारी, संबंधित कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते छोटूभाई शेख व शिष्टमंडळातील पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता व जयहिंद सैनिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने, पत्रकार बाळू जिवने, अशोक बावणे, यादवजी घ्यार
व तसेच दिव्यांग पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here